१
देवाचिया द्वारीं उभा क्षणभरीं । तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥
२
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरीसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव समा । वायां तूं दुर्गमा न घालीं मन ॥३॥
ज्ञानदेव पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
३
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं त्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
४
भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेवीण शक्ति बोलूं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वायां ॥२॥
सायास करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरि जप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचे ॥४॥
५
योग याग विधी येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेवीण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैंसा कळे ॥२॥
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूंचे संगती तरणोपाय ॥४॥
६
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥२॥
मोक्षरेखे आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वी ॥४॥
७
पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणे अभक्तांसी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति तो पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैसा दयाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
८
संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपती येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥
एकतत्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥३॥
नामामृत गोडी वैष्णवा लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
९
विष्णूवीण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
उपजोनी करंटा नेणें अद्वैतवाटा । रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान । त्या कैचे कीर्तन घडे नामी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
१०
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया । हरिवीण धावया न पावे कोणी ॥२॥
पुराणसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्हीं लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
११
हरि उच्चारणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रें ॥१॥
तृण अग्निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥
हरि उच्चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाधा भय तेथें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
१२
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धी । वायांचि उपाधि करिसी जना ॥१॥
भावबळें आकळें येरवी नाकळे । करतळीं आवळें तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरीं । यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥
१३
समाधी हरीची सम सुखेंविण । न साधेल जाण द्वैतबुद्धी ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाही दुजें । एका केशवा राजें सकळ सिद्धी ॥२॥
ऋद्धि सिद्धी निधी अवघीच उपाधि । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥३॥
ज्ञानदेवो रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥४॥
१४
नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंत राशी ताप । पायाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती ते वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥
१५
एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुद्धि घेतां समान श्रीहरी । शमदमावैरी हरि झाला ॥२॥
सर्वाघटीं राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्त्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥
१६
हरिनाम बुद्धि जपे तो नर दुर्लभ । वाचेसी सुलभ राम कृष्ण ॥१॥
राम कृष्ण नामीं उन्मनी साधिली । तयासि लाधली सकळ सिद्धी ॥२॥
सिद्धी बुद्धि धर्म हरिपाठीं आले । प्रपंची निमाले साधुसंगे ॥३॥
ज्ञानदेवीं नाम रामकृष्ण ठसा । येणें दशदिशां आत्माराम ॥४॥
१७
हरिपाठकीर्ती मुखें जरा गाय । पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृपितृभ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनि ठेले ॥३॥
ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिलें माझ्या हातीं ॥४॥
१८
हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । हरिवीण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळही घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गे गेला तो येथें मुकला । हरिपाठे स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । राम कृष्णीं आवडी सर्वकाळ ॥४॥
१९
नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठे ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । हरिवीण नेम नाहीं दुजा ॥४॥
२०
वेदशास्त्रप्रमाण श्रुतींचे वचन । एक नारायण सार जप तप ॥१॥
जप तप कर्म हरिवीण धर्म । वाउगाचि श्रम वाया जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकलिकें ॥३॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥४॥
२१
काळ वेळ नाम उच्चारिता नाहीं । दोन्हीं पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥
राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥
हरिनाम सार जिव्हां या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥
२२
नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ । लक्षुमीवल्लभ तयांजवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म तो नर्कचि पैं जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहूनि वाड नाम आहे ॥४॥
२३
सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्त्वी कळा (काळ) दावी हरी ॥१॥
तैसे नव्हे नाम सर्व वरिष्ठ । येथें कांहीं कष्ट न लगती ॥२॥
अजपा जपणे उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धार असे ॥३॥
ज्ञानदेवा जिणे नामेंविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥
२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वा घटीं राम भावशुद्ध ॥१॥
न सोडी रे भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥२॥
जात वित्त गोत कुळ शीळ मात । भजेका त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । तेणें वैकुंठभुवनी घर केले ॥४॥
२५
जाणीव नेणीव भगवंती नाहीं । हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रणाम नेणवे वेदांसी । ते जीवजंतूसी केवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असें ॥४॥
२६
एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेशीं सद्गत जपें आधीं ॥२॥
नानापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिक पंथा जाशी झणीं ॥३॥
ज्ञानदेवा नाम मौन जपमाळ अंतरीं । धरोनी श्रीहरी जपें सदा ॥४॥
२७
सर्व सुख गोडी सर्वशास्त्रनिवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति काढीं सर्व माया तोडीं । इंद्रिया सवडी लपो नको ॥४॥
तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा । शांतिदया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
२८
अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वासें ज्ञानदेवें ॥१॥
नित्य पाठ करी इंद्रायणीतीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावे एकाग्रीं स्वस्थ चित्त मन । उल्हासें करुन स्मरण जीवीं ॥३॥
अंतकाळीं तैसा संकटाचे वेळीं । हरि तया सांभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनांनी घेतली प्रचीती । आळशी मंदगती केवीं तरें ॥५॥
श्रीगुरु-निवृत्तिवचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥
Sunday, December 27, 2009
Wednesday, April 22, 2009
आशा - संत एकनाथ
आशेपाशी काम आशेपाशी क्रोध । आशेपाशी भेद लागलासे ॥
आशेपाशी कर्म आशेपाशी धर्म । आशेपाशी नेम नानात्वाचा ॥
आशेपाशी याती आशेपाशी जाती । आशेपाशी वस्ती अहंकाराची ॥
एकाजनार्दनी निराशी तो धन्य । त्यासी नारायण सांभाळीता ॥
This abhang seems to echo the thought of Nishkaam Karma of BhagavadGita. आशा means Hope. So whenever we hope for something to happen, it is like having an expectation for some fruit. BhagavadGita tells us to work without an expectation of result. Here, Sant Eknath explains ill-effects of having such expectation/hope.
He explains आशा brings with itself host of other probles such as anger, lust, attachment, ego etc. He says in the end that the one who is not having any such hope/expectation is really lucky and Lord Narayana himself takes care of such person.
आशेपाशी कर्म आशेपाशी धर्म । आशेपाशी नेम नानात्वाचा ॥
आशेपाशी याती आशेपाशी जाती । आशेपाशी वस्ती अहंकाराची ॥
एकाजनार्दनी निराशी तो धन्य । त्यासी नारायण सांभाळीता ॥
This abhang seems to echo the thought of Nishkaam Karma of BhagavadGita. आशा means Hope. So whenever we hope for something to happen, it is like having an expectation for some fruit. BhagavadGita tells us to work without an expectation of result. Here, Sant Eknath explains ill-effects of having such expectation/hope.
He explains आशा brings with itself host of other probles such as anger, lust, attachment, ego etc. He says in the end that the one who is not having any such hope/expectation is really lucky and Lord Narayana himself takes care of such person.
Subscribe to:
Posts (Atom)