Friday, September 22, 2017

आपुल्या विचार करीन जीवा‌शी - संत तुकाराम


आपुल्या विचार करीन जीवा‌शी । काय या जनाशी चा‌ड मज ॥
आपुले स्वहित जाण‌ती सकळे । निरोधिता बळे दु:ख वाटे ॥
आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनिया घरी निजो सुखे ॥
माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनिया वाट आणिका लावू ॥
तुका म्हणे भाकू आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥


साधक अवस्थेत असताना आपण स्वहिताचा विचार करावा असं संत तुकाराम येथे सांगतात. बाकी लोक अापल्या सांगण्याने बदलत नसतील, तर त्याचे दु:ख मानू नये, स्वत:ला त्रास करून घेऊ नये. अापण अापल्या परीने प्रयत्न करून बाकीच्यांना भक्तीचा पंथ दाखवण्याचा प्रयत्न करावा अाणि त्यांनी ऐकले तरी ठीक नाही ऐकले तरी ठीक या नियमाने वागावे.

तुकाराम महाराज म्हणतात,
मी आता स्वत:च्या जीवाचा विचार करीन, जनांचा जास्त विचार करणार नाही.
सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत, त्यांना जर आपण काही सांगितले किंवा काही वाईट सवयी सुधारण्यासाठी सांगितले (निरोध करण्याचा प्रयत्न केला), तर त्याचे लोकांना दु:ख होते.
त्यामुळे मी माझ्या परीने भगवंताची कथा-कीर्तन करीन, ते कोणी ऐको वा न ऐको, मी वाईट वाटून घेणार नाही. घरी जाऊन सुखाने, निश्चिंतीने झोपी जाईल (त्यासाठी स्वत:ची झोप उडवून घेणार नाही).
मला कुठे एवढे पडले आहे की ही भक्तीची जी वाट मला सापडली आहे, बाकी जनांना ही त्या वाटेला लावू.
आता पांडुरंगाला माझीच करुणा भाकावी, बाकी ज्याची जशी भावना/विचार आहे, त्याप्रमाणे पांडुरंग त्यांना फळ देईलच!

In short, do not worry about results of your preaching to others. Instead, be focused on improving yourself, all the rest will be taken care by Lord himself.