Friday, July 31, 2015

देव श्रेष्ठ की संत? - संत एकनाथ

एकनाथी भागवत हा मराठीचा मानाचा तुराच आहे. भागवत ग्रंथातील अकराव्या स्कंधावर (जे की परब्रम्ह श्रीकृष्णाच्या अवताराशी निगडीत आहे) लिहीलेली ही टीका होय. त्यातूनच खालील ओव्या घेतलेल्या आहेत. राजा वसुदेवांकडे नारद मुनी आले असता वसुदेव त्यांना प्रणाम करतात व त्यांची स्तुती करतात. त्या प्रसंगात एकनाथांनी ह्या ओव्या लिहील्या आहेत. एकनाथ महाराज अत्यंत सुरेख शब्दात आणि समर्पक उदाहरणांसह हे पटवून देतात की संत किंवा साधू हे देवा पेक्षा श्रेष्ठ आहेत.

देवाचा अवतार होये । दासां सुख दैत्यां भये । तेथही ऐसे विषम आहे । हे न समाये तुजमाजी ॥
तू देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपाशी । रावण तुज नेऊनि एकांतासी । निजगुह्यासी स्वये सांगे ।।
जरासंधू कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरी । आणि कृष्णाचे सभेमाझारी । आप्तत्वे थोरी पै तुझी ॥
नाम घेवो नेदी देवांचे । हे बिरुद हिरण्यकशिपूचे । त्यासी कीर्तन तुझे रुचे । विषमत्व साचे तुज नाही ॥

एकनाथ महाराज म्हणतात की जेव्हा देवाचा अवतार होतो, तेव्हा दासांना, भक्तांना सूख होते पण दैत्यांना मात्र भय वाटते. हा जो भक्त आणि दैत्य यांत फरक असतो तो देवाकडेच असतो, संतांकडे नाही. वसुदेव म्हणतात, हे नारदा हा भेद तुझ्याकडे नाही. तू देवांचा ही आप्त किंवा जवळचा आहेस आणि दैत्यांचाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. रावण तर स्वत:चे सर्व गुह्य (secret) तुला एकांतात सांगत असे. जरासंध हा कृष्णाचा वैरी आहे, त्याच्या ही घरी तुझे येणे जाणे असे. आणि कृष्णाशी तुझी जवळीक तर अत्यंत थोर व प्रसिद्ध आहे, त्यामुळे तुला कृष्णाच्या सभेत विशेष महत्व आहेच. हिरण्यकशिपूचे तर हे ब्रिदच होते की तो देवाचे नाव ही कोणाला घेवू देत नसे. परंतू तुझे कीर्तन मात्र त्याला आवडत असे. खरच तुझ्याकडे देव-दैत्य, शत्रु-मित्र असा फरक नाही.

इतर देवांची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण । तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥
त्याचे जीवे सर्वस्वे भजन । केल्या निजांग देऊनि होये प्रसन्न । परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे॥
तैसी नव्हे तुमची बुद्धि । दीनदयाळा त्रिशुद्धी । तू तव केवळ कृपानिधी । ऐक तो विधि सांगेन ॥
तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिले गुह्यज्ञान । ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥
प्रल्हाद उपदेशिला जेव्हा । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हा । तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसावा दीनांसी ॥
केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एकाएक । महाकवि केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥ 
तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारी । म्हणोनि देवो तुमचा आज्ञाधारी । तुम्ही म्हणाल त्याते उद्धरी । येऱ्हवी हाती न धरी आनाते॥
ऐसा तू दीनदीक्षागुरू । ब्रम्हज्ञाने अतिउदारू । तरी पुसेन तो विचारू । निजनिर्धारू सांगावा ॥

पुढे एकनाथ महाराज सांगतात, की कसे देव ही भक्त-दुर्जन असा फरक करतो परंतू नारदा सारखे साधू-संत हा फरक करत नाहीत. ते म्हणतात, इतर देवांचे तर सोडा पण सर्वात थोरला देव परमेश्वरसुद्धा स्वार्थी आहे. तो सुद्धा जीव घेतल्यावाचून भेटत नाही, पण एकदा प्रसन्न झाला की मात्र अगदी भक्तासाठी गर्भवास सुद्धा सोसायला तयार होतो (म्हणजेच माणसाचा जन्म ही घेतो). त्याचे भजन जर सर्वस्व देऊन केले, तर अशा भक्ताला प्रसन्न होऊन तो निजांग म्हणजेच सायुज्य मुक्ती पण देऊन टाकतो. पण जो त्याचे भजन करत नाही त्याकडे तो चुकूनही जात नाही.
हे नारदा, दीनदयाळा, तुमची बुद्धी मात्र तशी नाही, तू केवळ कृपानिधीच आहेस. तुझ्याकडे असा आपपरभाव नाही, ते कसे तर ऐक सांगतो. तू व्यास ऋषी, जे की थोर ज्ञानी आहेत, त्यांना गुह्यज्ञानाची शिकवण दिलीस आणि ध्रुव बाळ, जो की अज्ञानी आहे हे जाणून त्यास ही तू उपेक्षिले नाही. त्याला ही तू गुह्यज्ञान सांगितलेस.
प्रल्हादाला उपदेश करताना, तो दैत्यपुत्र म्हणून फरक केला नाहीस. तुझी कृपा ही दीनांसाठी विसाव्याचे स्थानच आहे. वाल्या जो की केवळ वाटपाड्या होता, त्याला ही भजन न करता बघून तू उपदेश केला आणि एक महाकवी बनविले, ज्यास देव ही वंदन करतात. तुम्ही खरोखर परमेश्वराचा आत्माच आहात, त्यामुळे परमेश्वर तुमचा आज्ञाधारी आहे. तुम्ही म्हणाल त्याचा उद्धार देव करतो एरवी मात्र तो असे मनात आणत नाही. असा तू दीन जनांसाठी दीक्षा देणारे आणि त्यांना ब्रम्हज्ञान देणारे, अत्यंत उदार असे गुरूच आहात.

संत हे देवापेक्षाही जास्त करुणामय आणि दयाळू असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात अत्यंत पुण्यवान माणसांनाच अशा साधू-संतांची संगती मिळते. त्यामुळे जेव्हा एखाद्या खऱ्या संताची गाठ पडेल, तेव्हा अगदी दुर्लभ रत्न मिळल्याप्रमाणे आपण आनंदित होऊन त्यांची मनोभावाने सेवा करायला हवी. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे,

"ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूंचे संगती तरणोपाय॥"