याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||
संत ज्ञानेश्वर महाराज जो 'सोनियाचा दिनु' म्हणतात तो तुकारामांच्या जीवनात आला त्या वेळचा हा अभंग. त्यांनी सगळे कष्ट, त्याग, अभ्यास ज्या साठी केले ते त्यांना प्राप्त झाले असा हा मंगल क्षण. अत्यंत कठोर मेहनत घेतल्यानंतर जेव्हा कष्टाचे चीज होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मौल्यवान असते. तुकाराम महाराजांनी भागवत्प्राप्ती साठी सगळे कष्ट घेतले होते, ते फलद्रुप झाल्याचा हा क्षण.
ते म्हणतात त्यांनी जो सर्व अट्टाहास केला तो यासाठी होता कि आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा. आयुष्याच्या अंती समाधान असावे. अपूर्ण इच्छा, मृत्यूचे भय इ. काही नसावे. ते म्हणतात कि आता मला विसावा मिळाला आहे. आता मी निश्चिन्त आहे कारण आता कुठलीही तृष्णा त्यांच्या मनात शेष नाही, समाधान आहे. मनात कुठलीही तृष्णा नसणे, समाधान आणि आनंद असणे हेच भगवत्प्राप्तीचे लक्षण आहे.
ते पुढे म्हणतात कि आतापर्यंत जे कष्ट घेतले त्याचे आता कौतुक वाटते आहे. म्हणजेच मेहनत घेताना जो त्रास सहन केला तो आता त्रास न वाटता गोडच वाटतो आहे. कारण त्या कष्टांमुळेच आजचा मंगल दिवस पाहायला मिळाला आहे. ते पुढे म्हणतात कि आता मुक्ती हिच आता त्यांची नवरी होणार आहे, म्हणजेच हे जग सोडल्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्त होणार आहे. आणि तो पर्यंत खेळी मेळित उरलेले आयुष्य काढायचे आहे.
या आणि यासारख्या तुकारामांच्या अभंगातून आपल्यासारख्या साधारण जनांना प्रेरणा मिळते. आपण जर जीवापाड मेहनत घेतली तर भागवत्प्राप्ती ही दूर नाही हेच कळते. आपणही सगळ्यांनी अट्टाहास करावा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा हीच प्रार्थना!