सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडीये फांदा घातलासे । हिंडवुनी पोट भरी दारोदारी । कोंडूनी पेटारी असे रया ।।१।।
तैसी परी जाली पांडुरंगा । गुंतलो तो मी गा सोडी आता । माझे मज काही न चलेसें जाले । कृपा हे तुज न करता ।।धृ।।
आविसे मीन लावियला गळी । भक्ष तो गिळी म्हणवूनिया । काढुनी बाहेरी प्राण घेऊ पाहे । तेथे बापमाय कवण रया ।।२।।
पक्षी पिलया पातले आशा । देखोनियां फासा गुंते बळे । मरण नेणे माया धावोनि वोसरे । जीवित्व ना जाली बाळे ।।३।।
गोडपणे मासी गुंतली लिगाडी । सांपडे फडफडी अधिकाधिक । तुका म्हणे प्राण घेतली आशा । पंढरीनिवासा धाव घाली ।।४।।
पुर्वीच्या काळी गारुडी सापांना पकडून त्यांच्याकडच्या पेटारीत ठेवायचे, आणि गावोगावी जाऊन सापांचा खेळ दाखवून आपला उदरनिर्वाह करायचे. त्यात गारुडी पुंगी वाजवतो आणि साप पुंगीच्या आवाजात गुंतून राहतो, डोलत राहतो. स्वतःचे स्वातंत्र्य तो त्या नादापायी घालवतो, आणि त्यामुळे सगळे आयुष्य त्याला त्या पेटीमध्ये काढावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता तसे झालेले आहे, मी या संसारात गुंतलो आहे. आता मला मी गुंतलोय हे तर कळतंय पण तरी माझे काही चालत नाहीये. तू जर कृपा केली तरच आता मी यातून सुटू शकतो.
तुकाराम महाराजांनी घेतलेलं हे सापाच उदाहरण खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यांनी वापरलेले शब्दही अत्यंत संयुक्तीत आहेत. ते म्हणतात "हिंडवुनी पोट भरी दारोदारी", ह्या संसाराच्या मायेने मला कोंडून ठेवले आहे, जसे गारुडीने सापाला. आणि संसारात ती मला पोटासाठी, पैशासाठी दारोदार फिरवते आहे. हे आजही तंतोतंत लागू होते, आपण पैशात, प्रतिष्ठेत इतके गुंतून आहोत आणि त्यात अजून आश्चर्याची बाब अशी की आपण अडकून आहोत हे आपल्यालाही कळत नाही.
तुकाराम महाराज अजून उदाहरणे देतात, ते म्हणतात मासे पकडणारे लोक, माश्यांना गळाच्या आशेला लावतात आणि जेव्हा त्या आमिषाच्या आशेने मासा गळाला पकडतो तेव्हा तो मासेमार त्याला पाण्याबाहेर काढतो आणि त्याचे प्राण घेतो. त्याचप्रमाणे पक्षी पिलाला सोडवण्याच्या आशेने स्वतः पिले अडकलेल्या जाळ्यात जाते आणि स्वतः पण प्राण गमावते. तसेच माशी पण गोडीच्या आशेने गुळावर जाऊन बसते. आणि ओल्या गुळाला चिटकते, तेव्हा ती पंखानी बरीच फडफड करण्याचा प्रयत्न करते, पण तिची सुटका होत नाही.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा! ही सर्वांचे प्राण घेणारी "आशा", माझेही प्राण घेत आहे. मला माझी स्वतःहुन सुटका करून घेता येत नाहीये, तूच आता धाव घाल आणि माझी रक्षा कर.
एका साधकाच मन, तुकाराम महाराज खूप सुंदर उदाहरणांसहित उलगडून दाखवतात. एकीकडे भगवंताच्या भक्तीची, दर्शनाची ओढ असताना, दुसरीकडे त्याला संसारातल्या गोष्टी आणि विविध आशा/निराशा धरून असतात, लवकर सुटू देत नाहीत. अशा वेळी तो देवाचा धावा करतो, की तूच मला वाचव.
No comments:
Post a Comment